पुणे : प्रधानमंत्री मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले 4 जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून यावर इटलीने रोख लावली, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड .आंबेडकर म्हणाले, जर हा माल इस्रायल गेला तर यातून जवळपास 17 हजार शेल्स बनवले जातील, ज्याचा वापर गाझा पट्टीवर केला जाईल. त्यामुळे इटली सरकारवर तेथील पोर्टमधील कामगार संघटनांनी दबाव आणून हे जहाजे रोखून धरले आहेत. भारतातून इस्रायलला हा मिलिटरी स्टील पोहचवले जातंय. इराणला ही गोष्ट समजल्यामुळे त्यांनी भारताला तेल देण्याचे कमी केले. ही गोष्ट जगाला कळू नये म्हणून पंतप्रधान मोदी इटलीला गेले आहेत. पंतप्रधान मोदीचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्यानंतर प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचा इटली दौरा हा ‘भीक मांगो’ अशा पद्धतीचा होता. हा दौरा भारताच्या हिताचा होता असे मी मानत नाही.

भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान भारतातील तरुणांच्या संदर्भात जे वक्तव्य केले होते, त्यावर भाष्य करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, भारताच्या सरन्यायाधीशांनी आता सरळ देशातील तरुणांची माफी मागितली पाहिजे. तेवढे धैर्य त्यांनी दाखवले पाहिजे.