रसायनी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रसायनी यांच्यावतीने बुधवार दि.27 रोजी कसाडी नदी प्रदूषण प्रकरणी संयुक्त पाहणी करण्यात आली. कासाडी नदी तळोजा एमआयडीसी परिसरातील रासायनिक उद्योगांकडून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे गंभीररीत्या प्रदूषित झाल्याचे या पाहणीत निदर्शनास आले.
संयुक्त पाहणीदरम्यान परिसरात अनेक ठिकाणी तीव्र दुर्गंधी पसरलेली आढळून आली. विविध नाले व गटारे रासायनिक मिश्रित पाण्याने भरलेली दिसून आली. काही कारखाने दिवसाढवळ्या रासायनिक सांडपाणी सोडताना आढळल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.
कासाडी नदी प्रदूषणासंदर्भात यापूर्वी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांनी मोठी कारवाई करत एमआयडीसी तसेच अनेक कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली होती. तसेच नदी पुनरुज्जीवनासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत भविष्यात कोणतेही प्रदूषण होणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित केली होती. मात्र, तरीही पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.