लांजा : लांजा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे मानवजातीच्या संरक्षणासाठी तर आहेतच, परंतु पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठीही नेहमी तत्पर असतात. शहरातील कुंभारवाडी परिसरात महामार्गालगत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेल्या गटारात एक गाय अडकून पडली होती.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील हिंदू-मुस्लिम बांवधांनी तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी दाखल होत गाईला गटारातून बाहेर काढत मानवतेचे दर्शन घडवले. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवत मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याचवेळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे त्या मार्गावरून गस्त घालत होते. त्यांनीही तत्परता दाखवत नागरिकांसोबत मदतकार्य केले. त्यानंतर सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून गाईला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.
या मदतकार्यात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, राजू तुळसणकर, गौरव तेरवणकर, प्रसाद गुरव, लेझम मुल्ला, आजीम वणू तसेच गाईचे मालक वसंत कुंभार आदींनी सक्रिय सहभाग घेतला. गाईला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी मदतकार्याचे कौतुक केले. दरम्यान, या घटनेतून लांजा शहरातील सामाजिक ऐक्य आणि मानवतेचे दर्शन घडले.
