मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो महिनाभर पुढे ढकलावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून केली आहे.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून या कालावधीत आषाढी वारी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जवळपास २० हून अधिक जिल्ह्यातील वारकरी या कालावधीत पंढरपूरला वेगवेगळ्या दिंड्यांमधून पायी जात असतात, ते घरी नसल्याने त्यांची नावे वगळली जाऊ शकतात. तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टी होईल व जनजीवन विस्कळीत होईल. या सर्वांचा विचार करून एसआरए कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असे म्हटले आहे.