रसायनी : शेंडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) तृतीय पदवीदान समारंभ शुक्रवार दि.29 रोजी दुपारी विद्यापीठ परिसरातील जी. डी. बडाया ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध विद्याशाखांतील 1268 विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून शौर्य, राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. पदवी प्राप्त करणे ही जीवनातील महत्त्वाची उपलब्धी असली तरी बौद्धिक आणि सामाजिक स्तरावरही स्वतःचा विकास करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. एल. वर्मा यांनी विद्यापीठाच्या वार्षिक प्रगती अहवालाचे सादरीकरण केले. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, कौशल्य विकास आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात विद्यापीठ सातत्याने प्रगती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या समारंभाला विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
