खानावळे (वैभव लबडे) : खानावळे ग्रामपंचायत हद्दीतील बारवई पूल परिसरात सध्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाच्या परिसरातील स्थानिक दुकानदारांकडून तसेच आठवडा बाजारातील विक्रेत्यांकडून टाकाऊ साहित्य, प्लास्टिक आणि इतर ओला-सुका कचरा थेट पुलाखालील नदीपात्रात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यामुळे नदीपात्राला कचराकुंडीचे स्वरूप आले असून, या गंभीर बाबीकडे खानावळे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीला आपल्या हद्दीतील या विदारक परिस्थितीचे भान का नाही, असा संतप्त सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून बारवई पुलाखालील कचरा हटवावा आणि नदी प्रदूषित करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.