लांजा : लांजा एसटी स्थानकावर घडलेल्या घटनेत देवरूख आगाराची बस क्रमांक एमएच-१४ बीटी-२३१६ ही एसटी बस देवरूखहून लांजाकडे घेऊन चालक जितेंद्र माईन हे लांजा येथे आले. परत जाताना बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. बस सुटताच प्रवासी तुकाराम खाके (रा. पालू) यांनी गाडीतून ओरडून बस थांबवली व, “माझी आई खाली आहे, गाडी सोडू नका,” असे सांगितले.

यानंतर त्यांनी वाहक राहुल लक्ष्मण खानविलकर (रा. देवरूख) यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच शर्टाची कॉलर धरून “चिरून टाकीन,” अशी धमकी दिली. यावर वाहकांनी, “तुमची काही अडचण असेल तर नियंत्रकांना सांगा,” असे सांगितले. त्यावर खाके यांना राग आला.

अखेर वाहक राहुल खानविलकर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी अक्षय तुकाराम खाके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३२४(२) तसेच भादंवि कलम ३५३, ३२३, ३५२, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस सहाय्यक निरीक्षक देवकन्या मैदाड करीत आहेत.