लोटे : लोटे औद्योगिक वसाहती मधील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक कारखाना विरोधात गेले १३५ दिवस चालू असलेल्या धरणे आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची या आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून सदर प्रकरणी लक्ष देऊन मला अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या होत्या. याचा परिणाम म्हणूनच १३५ दिवसांनी का होईना प्रशासनाने या धरणे आंदोलनाची दखल घेतली आणि आंदोलनाचे कारण व भूमिका जाणून घेतली.
लोटे औद्योगिक वसाहती मधील पी फास रसायन निर्मिती करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्या विरोधात लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, अखिल दाभोळखाडी भोई समाज संघटना आणि पंचक्रोशीतील अकरा ग्रामपंचायती यांनी धरणे आंदोलन उभे केले असून पर्यावरण आणि मानवी जीवनाचा नाश करणारे पी फास रसायन निर्मिती करणारा कारखाना बंद झालाच पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योग मंत्री यापैकी कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. इतकेच काय तर १३५ दिवस चालू असलेल्या या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून ही घेतली गेली नाही. अशातच दिनांक २९ मे रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची या आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन ‘पी फास’ रसायन निर्मिती करणाऱ्या या कारखान्या विरोधातील आंदोलना मागची भूमिका स्पष्ट केली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीन धोरणाबाबत कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सदर प्रकरणाची सखोल माहिती घेऊन अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या. सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, आंदोलनकर्त्यांचे शिष्ट मंडळ आणि प्रशासन यांची एक बैठक मंत्रालयात घेऊ, असे आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले. याचाच परिणाम म्हणून की काय काल दिनांक चार जून रोजी खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार श्री सुधीर सोनवणे यांनी धरणे आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आपण सदर बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवणार असून, पुढील निर्णय जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा घेतील असे सांगितले. प्रशासनाचे योग्य असेल त्या ठिकाणी आंदोलनास सहकार्य असेल असे आश्वासन दिले. यावेळी कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके,भालचंद्र पटवर्धन,मंगेश चाळके, रवींद्र गोवळकर, शंतनू रेडीज यांच्यासह अन्य धरणे आंदोलन करते उपस्थित होते.