पोलादपूर (शैलेश पालकर) – अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात प्रतापगड व महाबळेश्वर रेस्क्यू टीमने घेतलेल्या शोधमोहिमेनंतर पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील 100 फूट खोल दरीतून आजीचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. त्यामुळे कशेडी व आंबेनळी घाट हे ‘किल अँड थ्रो’साठी कुप्रसिद्ध होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील तीनवीरा गावातील आदर्श शेडगे (वय 32) या संशयित युवकाने दागिन्यांच्या हव्यासापोटी दोन दिवसांपूर्वी सारळ गावातील स्वतःच्या सुनंदा पाटील (वय 85) या सख्ख्या आजीचा खून केला. या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने आजीचा मृतदेह आंबेनळी घाटातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील ‘बावली टोक’ ते ‘दाभिळ टोक’ दरम्यान असलेल्या खोल दरीत फेकून दिला.
अलिबाग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत संशयित युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह फेकलेले ठिकाण दाखवून दिले. त्यानंतर अलिबाग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दि. 4 जून 2026 रोजी दिवसभर ऊन-पावसाच्या माऱ्यात रेस्क्यू टीमने शोधमोहीम राबवून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले.
