ठाणे : विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या यशस्वी वाटचालीचा दावा केला आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत राज्यातील विकासकामे, क्लस्टर योजना आणि आगामी निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मतदार आणि उमेदवारांचे आभार मानले. ठाणे विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने “ठाण्यात विजयाचे फाटक बिनविरोध उघडले,” असे ते म्हणाले.
शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे सांगत, ही आगामी निवडणुकांमधील मोठ्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडीवर निशाणा साधताना, या निवडणुकीत त्यांच्या अंतर्गत गटबाजीचे चित्र समोर आल्याचा दावा शिंदे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमधून महाविकास आघाडीची स्थिती स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
