मुंबई : पूर्वीच्या भटक्या विमुक्त आघाडीचे रूपांतर आता भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त मोर्चामध्ये करण्यात आले असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करणे हेच या मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात भटके विमुक्त मोर्चाच्या संभाव्य पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना भाजपचा इतिहास, पक्षाची विचारधारा, भटके विमुक्त मोर्चाची पार्श्वभूमी, भटक्या-विमुक्त समाजासमोरील विविध प्रश्न तसेच ते सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.