महाड : “खासदार सुनील तटकरे यांची कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. ते आधी स्वतःचा फायदा करून घेतात आणि नंतर सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडतात,” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांनाही लक्ष्य करत पालकमंत्रीपदाच्या वादावरून खोचक टोला लगावला.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगड येथे दर्शनासाठी आलेले आमदार रोहित पवार हे गडावरून खाली उतरल्यानंतर रोपवे परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अनिकेत तटकरे आमदार झाले आहेत. यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद संपुष्टात येणार का, तसेच भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आ. पवार म्हणाले, “वाद संपेल; पण तटकरेंची सवय सर्वांना माहिती आहे. ते स्वतःचा राजकीय फायदा साधून घेतात आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडतात.” पुढे बोलताना त्यांनी गोगावले यांच्यावरही निशाणा साधला. “जर उद्या गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळाले, तर त्यांनी आतापर्यंत तटकरेंवर केलेली टीका ही विचारांची नव्हती, तर केवळ पद मिळवण्यासाठी होती, असे मानावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.
“मला वाटत होते की तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष हा अनेक वर्षांचा आणि वैचारिक आहे. मात्र, पद मिळाल्यानंतर गोगावले शांत झाले, तर त्यांचा आक्रमकपणा हा केवळ सत्तेसाठी होता, असेच म्हणावे लागेल. मग पद मिळताच त्यांनी आपली तलवार म्यान केली, असा अर्थ निघेल,” अशी खोचक आणि घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
