अहमदाबाद (गुजरात) : येथे दि. 4 ते 8 जून 2026 दरम्यान पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत लोटेमाळ गावची कन्या कु. तन्वी चैताली भूषण रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. जगातील 78 देशांतील सुमारे 600 स्पर्धकांमध्ये अव्वल ठरत तिने ही अभिमानास्पद कामगिरी साध्य केली आहे.
चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली तन्वी ही पाग व्यायामशाळेची खेळाडू असून प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश संपादन केले आहे. यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून तिने कोकण, महाराष्ट्र आणि भारताचे नाव उंचावले आहे.
सध्या तन्वी, तिचे पालक आणि प्रशिक्षक मुंबई येथे असून उद्या, बुधवार दि. 10 जून 2026 रोजी मांडवी एक्सप्रेसने ती चिपळूण येथे आगमन करणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास तिचे चिपळूण रेल्वे स्थानकावर आगमन अपेक्षित आहे. तिच्या स्वागताची जय्यत तयारी डी. बी. जे. महाविद्यालय आणि पाग व्यायामशाळेच्या वतीने करण्यात आली आहे.
चिपळूणच्या मातीत जन्मलेल्या या कन्येने आपल्या कर्तृत्वाने केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर संपूर्ण चिपळूणचे नाव जागतिक मंचावर अभिमानाने झळकवले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी आता संपूर्ण चिपळूण एकत्र येण्याची वेळ आली आहे.
उद्या सकाळी 11.30 नंतर चिपळूण रेल्वे स्थानकावर विश्वविजेती तन्वीच्या स्वागतासाठी चिपळूणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूया. आपल्या शहराच्या या लेकीने भारताचा तिरंगा विश्वपटलावर उंचावला आहे; तिच्या या ऐतिहासिक यशाला मानवंदना देणे हे प्रत्येक चिपळूणकराचे कर्तव्य आणि अभिमान आहे.
“जिने विश्व जिंकले, त्या कन्येच्या स्वागतासाठी संपूर्ण चिपळूण एकवटूया…! आपल्या टाळ्यांचा कडकडाट, जयघोष आणि प्रेमाचा वर्षाव तिच्या यशाला साजेसा ठरू दे…!”

विश्वविजेती तन्वी रेडीज हिचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!