रत्नागिरी : अहिल्यानगर संगमनेर येथील तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथील पी.जी. सावंत यांना राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संविधान अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, डॉ. मुकुंद भारसाकळे, संघराज रूपवते, आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान मुल्यांचा प्रचार प्रसार, सामाजिक जनजागृती, विविध लोककलात्मक सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दिनांक ४ जून रोजी महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान झाल्यानंतर प्रकाश सावंत यांनी हा सन्मान शिल्पकार सेवा संघ चरवेली – ग्रामीण, चरवेली गावचे सर्व ग्रामस्थ, कार्यरत असलेल्या विविध धार्मिक, सामाजिक संस्था, सांस्कृतिक कला मंच, त्यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक व हितचिंतक यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, जनकल्याणकारी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. या त्यांच्या यशाबद्दल सर्व धम्म बंधूंनी, नातेवाईक व हितचिंतकांनी प्रकाश सावंत यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.