रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे साकवाच्या बांधकामादरम्यान स्लॅब अंगावर कोसळल्याने एका तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शिवाजी काटे, वय २७ वर्षे, हा कुर्धे येथील लिंगायतवाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावर सुरू असलेल्या पाखाडीच्या कामासाठी गेला होता. सोमवारी झालेल्या पावसामुळे पऱ्यावर टाकलेल्या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. त्यानंतर आज आकाश इतर कामगारांसह पऱ्यात उतरून साकवाच्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त असताना अचानक साकवाचा स्लॅब कोसळला आणि तो मलब्याखाली गाडला गेला.

पऱ्यात पाणी साचल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. अखेर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवून आकाशला बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.