चिपळूण : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ पासून आजपर्यंत देशाने विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. या विकासप्रवासाचे जवळून साक्षीदार असलेल्या पत्रकारांनी देशाच्या जडणघडणीतील घडामोडी, विविध समस्या, त्यावरील उपाययोजना आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणी आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर समाज, राज्य आणि राष्ट्राला दिशा देण्याचे कामही केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी खेर्डी येथील स्वामी निवास साई मंदिर येथे पत्रकार बांधवांना पुस्तिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करत त्यांचे आभार व्यक्त केले.
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त ७ जून ते २५ जूनदरम्यान देशभर आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.
पत्रकारांच्या मार्गदर्शक भूमिकेची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेली ‘अखंड भारत : १२ वर्षांची विकासगाथा’ ही पुस्तिका यावेळी पत्रकारांना भेट देण्यात आली.
लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पत्रकारांनी पुढील काळातही विधायक सूचना, मार्गदर्शन आणि लोकहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. राष्ट्रहिताच्या कार्यात पत्रकारांचे सहकार्य भविष्यातही लाभत राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.