सुधागड (धम्मशील सावंत) : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे चिवे गावात जमीन फेरफार नोंदीवरून एक मोठा वाद समोर आला आहे. संबंधित खातेदार व शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न बजावता जमिनीची आकारफोड (कमी-जास्त) मंजूर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी थेट सुधागड-पालीच्या तहसीलदारांकडे लेखी हरकत अर्ज दाखल केला असून, महसूल प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिवे येथील सर्व्हे क्रमांक ३ मधील जमीन ही अर्जदार राकेश रामचंद्र ठाकूर आणि इतर ग्रामस्थ शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकीची आहे. पिढ्यान्पिढ्या या जमिनीवर त्यांचाच प्रत्यक्ष ताबा व कब्जा असून प्रत्येकाचे स्वतंत्र ७/१२ उतारेही अस्तित्वात आहेत.
परंतु, गैरअर्जदार गजानन उत्तमराव मांटे (पाटील) (रा. जॉय व्हिला प्रोजेक्ट, चिवे) यांनी महसूल कार्यालयात आर.टी.एस. अर्ज दाखल करून या जमिनीच्या आकारफोडीत बदल घडवून आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अर्जाच्या आधारे पेडली गावचे मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) यांनी ४ जून २०२६ रोजी फेरफार क्रमांक १८३० ची नोंद तातडीने मंजूर केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.