मुंबई- राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये झपाट्याने होणारे बदल आणि भाजपाच्या वाढत्या आक्रमकतेमुळे सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांच्या महाविकास आघाडीचीही चिंतेत आहे. भाजपाच्या ‘साम, दाम, दंड, भेद ‘ या धोरणासमोर राज्यातील प्रादेशिक पक्ष आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. २०२९ मध्ये भाजपा महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत केलेल्या विधानाची आठवण अजूनही महायुतीतील मित्रपक्षांच्या मनात कायम आहे.

राज्यात स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय बाळगून असलेला भाजपा २०२९ च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले नेमके किती सहकार्य करणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आगामी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत मित्रपक्षांसाठी किता जागा सोडायच्या हे भाजपाच ठरवणार असल्याचे निश्चित आहे. गेल्या काही महिन्यांत राज्य मंत्रिमंडळासह विविध मंचांवर सत्ताधारी महायुतीत अविश्वासाचे वातावरण दिसून आले आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दोनदा दिल्लीवारी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर विधान परिषदेच्या जागावाटपाशी संबंधित सर्व चर्चा दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रात होतील, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.