देवरुख : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सचिन चोरगे यांचा पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार सचिन चोरगे यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी चिपळूण तालुका सोशल मीडिया प्रमुख म्हणून प्रभावीपणे कार्यरत असलेल्या चोरगे यांच्यावर आता जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली असून पक्षाचे विचार, भूमिका आणि संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे म्हणाले, “पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत साहेब आणि पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ माहिती प्रसारित करण्याचे माध्यम नसून विचारांची लढाई लढण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पक्षाची भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवरील शिवसेनेची भूमिका अधिक वेगाने व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका, शहर, महिला आघाडी, युवासेना आणि युवतीसेना पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून शिवसेनेचे डिजिटल नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पक्षाचे विचार पोहोचविणे, अपप्रचाराला तथ्यपूर्ण उत्तर देणे आणि प्रत्येक शिवसैनिकाचा आवाज जनतेपर्यंत पोहोचविणे, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
सचिन चोरगे यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे डिजिटल नेटवर्क अधिक मजबूत होईल आणि पक्षाच्या संघटन विस्ताराला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
