माणगाव – प्रतिनिधी : गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी शिवसेना – युवासेना माणगाव तालुका यांच्यातर्फे पक्षाच्या वर्धापनदिनी सुरु करण्यात आलेली रुग्णवाहिका सेवा अखंडितपणे सुरु राहील असे अभिवचन माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
शिवसेना – युवासेना माणगाव तालुका आयोजित शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि.१९ जून २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव याठिकाणी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा मंत्री भरत गोगावले व पक्षाचे कोअरकमीटी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आला. या कार्यक्रमास तालुका प्रमुख अँड.महेंद्र माणकर,माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश मेहता,वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कामेरकर,युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे,जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर,सभापती विलास शिंदे,राजिप सदस्य दिनेश हरवंडकर,डॉ.परेश उभारे,तालुका युवासेना अधिकारी ज्ञानेश्वर उतेकर,शहर संपर्कप्रमुख प्रसाद धारिया,शहर प्रमुख नितीन दसवते,सुधीर पवार,पंचायत समिती सदस्य रवींद्र टेंबे,निलेश केसरकर आदींसह शिवसेना – युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,उपजिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका,कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले पुढे म्हणाले कि,आमचे संपर्क प्रमुख अनिल नवगणे यांच्याकडे असणारी रुग्णवाहिका हि आपण सेवेत रुजू केली आहे. तालुका युवासेनेने या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज आयोजित केला आहे. माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण उपचाराकरिता येत असतात. या रुग्णांना कधी अधिक औषधोपचाराकरिता एमजीएम रुग्णालय,जे.जे.रुग्णालय,सायन रुग्णालय याठिकाणी पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. हि गरज ओळखून शिवसेना पक्षाच्यावतीने युवासेनेतर्फे या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गोरगरीब जनतेसाठी अत्यंत कमी खर्चात हि रुग्ण वाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती नसेल त्या लोकांना शिवसेना पक्ष संघटना मोफत रुग्णवाहिकेची सेवा देईल. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी असून याठिकाणी ज्याकाही सुविधा आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. रुग्णालयाच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील सोडविण्याचा आपण प्रयत्न करू असे सांगत त्यांनी सोनग्राफी मशीनवर ऑपरेटरची व्यवस्था लवकरच केली जाईल असे सांगितले.
शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनी सुरु केलेली रुग्णवाहिका सेवा अखंडितपणे सुरु राहील : मंत्री भरत गोगावले
