मुंबई : पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने 5500 विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने, खासगी वाहनांनी आणि एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भाविकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाने व्यापक नियोजन केले आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.