मुंबई (सुनील साळवी दैनिक सागर/ सागर wave) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत काल दुसऱ्या दिवशी विरोधकांचा जोर पाहायला मिळाला. प्रश्नोत्तराचा तास झाला तेव्हा आपल्या खात्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे दिली. हाच मुद्दा विरोधकांनी उपस्थित करत मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून उत्तरे देतात तर इतर मंत्र्यांना ते का जमत नाही अशा शब्दात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पहिला प्रश्न भविष्यात वीज भारनियमन होईल का आणि दुसरा प्रश्न अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्री संदर्भात विचारण्यात आला होता. आपल्या लेखी उत्तरात आणि सभागृहात मुख्यमंत्र्यांनी वीज भारनियमन होणार नसून सध्याची गरज २९ हजार मेगावॅट असली तरी पुढील पाच वर्षांकरिता ३३हजार ४८७ मेगावॅट वीज खरेदी करार करण्यात आले आहेत आणि २०३१-३२ अखेर महावितरणची वीज निर्मिती स्थापित क्षमता ७८हजार ५९१ मेगावॅट इतकी होणार आहे अशी माहिती दिली.
अमली पदार्थांच्या सेवन आणि विक्रीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, माहे एप्रिल २०२६ पर्यंत अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी ११४२ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये १६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत तर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध ३१९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.