मुंबई (सुनील साळवी) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी मंत्र्यांची गैरहजेरी आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीत इतर मंत्र्यांवर त्या खात्याची जबाबदारी देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभात्याग केला. या विषयावरून आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच लक्ष्य केले तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. सभागृहात तिहेरी तलाकाचा मुद्दाही चांगलाच गाजला.

काल मंगळवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही मंत्र्यांच्या गैरहजेरीत त्या खात्याच्या राज्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात येत असल्याची माहिती सभागृहाला दिली तेव्हा ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे,भास्कर जाधव काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या सर्वांनी जोरदार हरकत नोंदवली.

विजय वडेट्टीवर म्हणाले की, पूर्वी ही प्रथा नव्हती. अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय योग्य ठरला असता. उत्तरे देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्रीच हवेत. अन्यथा सभागृहाला काही महत्त्वच उरणार नाही. तर नाना पटोले यांनीही सरकारमधील मंत्री आता अध्यक्षांनाही जुमानत नाहीत की काय हेच यातून दिसून येत आहे अशी खरमरीत टीका केली. जयंत पाटील यांनी सांगितले, उत्तरे देण्यासाठी दुसऱ्या खात्याच्या मंत्रांवर जबाबदारी दिली तर जनतेच्या प्रश्नांना न्याय कोण देणार असा सवाल विचारला.