मुंबई : भारतीय प्रादेशिक भाषांच्या वाङ्मयीन इतिहासात मराठीसाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे कार्य गेली ११८ वर्षे अथकपणे सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीस कारणीभूत ठरलेली जी ग्रंथसंपदा निर्माण झाली, तिला आणि तिच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांना एकत्र ठेवण्याचे कार्य या परिषदेने महाराष्ट्रभर विविध शाखांच्या माध्यमातून यशस्वीपणे केले आहे. अशा या मराठी भाषेच्या संवर्धनाचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त संचालक मंडळाचा आणि कार्यकारी मंडळाचा सत्कार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण यांच्यासह परिषदेच्या संचालक मंडळातील सदस्य तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, पत्रकार आणि कलाकार या सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या आयोजनाचे विशेष आकर्षण म्हणजे श्री. अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाल्लाह’ या कादंबरीच्या २५व्या अभिवाचनाचा प्रयोग होय. या अभिवाचनात श्री. अभिराम भडकमकर यांच्यासह श्री. सुशील इनामदार, श्री. सलीम मुल्ला, श्री. सचिन सुरेश आणि सौ. स्वाती चिटणीस यांचा सहभाग असेल.
या बहारदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत, तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे हे कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित असतील. तसेच प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. राजेश पांडे यांचीही या सत्कार समारंभ आणि अभिवाचन कार्यक्रमास विशेष उपस्थिती असेल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संचालक मंडळाचा सत्कार आणि ‘इन्शाल्लाह’ कादंबरीच्या अभिवाचनाचा हा कार्यक्रम दिनांक २६ जून २०२६ रोजी प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्व साहित्यरसिक आणि मराठीप्रेमींना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रक प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री. अभिराम घड्याळपाटील आणि कार्यक्रम विभागप्रमुख श्री. सूरज आव्हाड हे आहेत.