मुंबई ( सुनील साळवी ): राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी बारा शोकप्रस्ताव मांडताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल कामकाज सुरू होताच दिलगिरी व्यक्त केली.

अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बारा शोक प्रस्तावांचे वाचन मी केले. जी प्रिंट माझ्याकडे आली ती अस्पष्ट आणि त्यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या. वाचन करताना माझ्याकडून जसेच्या तसे चुकीचे उच्चार झाले. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक भाषणे मराठीत केली. सर्व नियम आणि कार्यपद्धती ही मराठी भाषेतूनच केली.
मराठी भाषेबद्दल आपल्या प्रमाणेच मलाही अभिमान आहे. आशाताईंबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही मी कधी करू शकत नाही. जे घडले ते तांत्रिक चुकांमुळे घडले. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. याबाबत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात अध्यक्षांनी या विषयावर पडदा पडला.