पोलादपूर (शैलेश पालकर) : पोलादपूर तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांचे गट सध्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६-२७’ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. याखेरीज, ११ शेतकरी गटांनी अद्याप सुरुवात केलेली नसून, चार शेतकरी गटांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी भरत कदम यांनी दिली.

‘सत्यमेव जयते फार्मर कप’ ही प्रामुख्याने पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी एक अनोखी स्पर्धा आहे. शेती क्षेत्रातील प्रगती आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आज (सोमवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचे डिजिटल उद्घाटन होणार आहे.

पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी, तुर्भे खुर्द, वाकण, आंग्रे कोंड, कालवली, कुडपण बुद्रुक, गांजवणे, देवळे, परसुले, वझरवाडी, आडावळे खुर्द, कणगुले, काटेतळी, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक, किनेश्वर, कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक, गोलदरा, गोवेले, चरई, चांभारगणी खुर्द, चांभारगणी बुद्रुक, ढवळे, ताम्हाणे, तुर्भे कोंड, तुर्भे बुद्रुक, दाभिळ, धामणदिवी, धारवली, पळचिल, पार्ले, पैठण, बोरघर, बोलावले, भोगाव खुर्द, माटवण, मोरगिरी, मोरसडे, रानवडी बुद्रुक, लोहारे, सडवली, सवाद, साखर आणि हळदुले येथील पुरुष व महिला शेतकरी गटांनी भात पिकाला प्राधान्य दिले आहे. तर वझरवाडी येथील वझरवाडी शेतकरी गटाने आणि मोरगिरी येथील रामार्पण गटाने नाचणी, चरई येथील गटाने कारले, वझरवाडी येथील रवळनाथ शेतकरी गटाने भेंडी, तर दिवील येथील स्वामिनी महिला गटाने तूर या पिकांची वैविध्यपूर्ण लागवड केली आहे.