मुंबई – पुणे जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करावी अशा सुचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनीही प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीबाबत आढावा घेतला.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित भागातील नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवा. गावातील संपर्क तुटल्यास युद्धपातळीवर उपाययोजना करुन पूर्वरत करावे.मानवी जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून प्रत्येक निर्णय घ्यावा.नियंत्रण कक्ष 24×7 पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावा व प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा. धोकादायक भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून सुरक्षित निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात. पूर, भूस्खलन आणि धरण विसर्गाबाबत वेळेवर इशारे एसएमएस, सोशल मीडिया, ग्रामपंचायत व स्थानिक यंत्रणेमार्फत द्यावेत. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही. सर्व यंत्रणा सतत सज्ज ठेवाव्यात.एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल यांच्यात समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य करावे.