खेड : खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये रात्री झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह अखेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने शोधून काढले. सतीश शांताराम शेलार (वय ३०) आणि शांताराम बलराम शेलार (वय ८४) अशी मृतांची नावे असून, आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचे मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

रात्री मुसळधार पावसादरम्यान दहिवली-शेलारवाडी येथे अचानक भूस्खलन झाल्याने शेलार कुटुंबाचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत कल्पना शांताराम शेलार (वय ७३) यांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, बेपत्ता असलेल्या सतीश शेलार आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक मध्यरात्री चिपळूणहून घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, अंधार आणि डोंगराळ परिसरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. तरीही एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर आणि दिवसभर अथक प्रयत्न सुरू ठेवत शोधमोहीम राबवली.

अखेर आज दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आवश्यक पंचनामा, वैद्यकीय तपासणी व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.