श्रीवर्धन : आषाढी एकादशीचे वेध लागताच संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ या जयघोषाने अवघ्या महाराष्ट्राचे रस्ते दुमदुमून गेले आहेत. याच भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला. श्रीवर्धनमधील भरडखोल येथून कोळी समाज बांधव आणि विठ्ठलभक्तांची भव्य पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मुसळधार पावसाची परवा न करता विठूरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत.
“टाळ-मृदुंगाचा गजर… ‘राम कृष्ण हरी’चा चाललेला अखंड नामजप आणि विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेला वारकरी संप्रदाय… हे दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरडखोल ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे. आज सकाळी ठीक ९ वाजता भरडखोल गावातील सर्व कोळी बांधव आणि आजूबाजूच्या गावातील भाविक एकत्र आले आणि या सोहळ्याचा प्रारंभ झाला.”

“या पायी दिंडीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ ज्येष्ठ वारकरीच नव्हे, तर महिला आणि बालगोपाळांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि हातात टाळ घेतलेली लहान मुले एका रांगेत नाचत-गाजत विठ्ठल भक्तीमध्ये मुग्ध होऊन पंढरीच्या दिशेने निघाली आहेत.”