मुंबई : राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली.
विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली असता मंत्री ॲड.शेलार यांनी घोषणा केली. या लक्षवेधीत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार कलेने राज्यासह देश-विदेशात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. या कलेसाठी कार्यरत असलेल्या कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत राज्यस्तरीय समितीचा विस्तार करण्यात आला असून देवेंद्र नाईक, दत्ताप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले की, १ जानेवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडी गंमत तसेच शाहिरी व संगीत बारी या लोककलांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान दिले जाते. मात्र अनुदानाचा लाभ कलाकारांपर्यंत थेट पोहोचावा, यासाठी नव्या निर्णयानुसार वाढीव निधीपैकी निम्मी रक्कम कलाकारांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल, तर उर्वरित रक्कम कलापथक चालकांना देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.