मुंबई : कोकणातील ज्येष्ठ लोककलावंतांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत-साहित्यिक मानधन योजना अंतर्गत स्वतंत्र वाढीव कोटा मिळावा तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागांतर्गत DIT IT Cell मधील गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ३०४ अनुभवी आयटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. या दोन महत्त्वाच्या विषयांवर चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी मा. मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात सविस्तर बैठक घेऊन शासनाकडे ठोस मागण्या मांडल्या.

बैठकीत कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये दशावतार, नमन, भारूड, कीर्तन, गोंधळ, लोकनृत्य आणि लोकगीत यांसारख्या पारंपरिक लोककलांचे जतन करणाऱ्या अनेक ज्येष्ठ कलावंतांना विद्यमान मर्यादित कोट्यामुळे मानधन योजनेचा लाभ मिळत नसल्याची बाब आमदार निकम यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे कोकण विभागासाठी स्वतंत्र वाढीव कोटा निश्चित करून अधिकाधिक पात्र कलावंतांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच निवड समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्या आणि योगदानाचा विचार करून त्यांनाही योग्य मानधन देण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

याच बैठकीत DIT IT Cell मधील ३०४ अनुभवी आयटी कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भातील विषयावरही चर्चा झाली. राज्याच्या डिजिटल प्रशासनात eOffice, eDistrict, RTS, DBT, BharatNet, PM-Kisan यांसह विविध महत्त्वाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत या कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या अनुभवाचा शासनाच्या आगामी माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये उपयोग व्हावा. या दृष्टीने सेवा समाप्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून न्याय्य तोडगा काढण्याची मागणी आमदार निकम यांनी केली.