मुंबई : राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक – युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घोषित केले.

या यात्रेच्या प्रारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. महाडिक बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.
युवा शक्ती जागर यात्रेसंदर्भात माहिती देताना श्री. महाडिक म्हणाले, दीड महिन्यापूर्वी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व मंत्री, आमदार, केंद्रातील मंत्र्यांची भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठासह अनेक ठिकाणच्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण दिले. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा पिढी जोडण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी असल्याचे लक्षात आल्याने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांनी परिश्रम घेऊन या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेची आखणी केल्याची माहिती श्री. महाडिक यांनी दिली.