खेड (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपविभाग खेड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांनी धडक देत कंत्राटी भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला.

महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर घेताना स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना डावलून, आधीपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना संधी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेत कंत्राटी पद्धतीवर आधीपासून कार्यरत असलेल्या स्थानिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनाच पुन्हा कामावर रुजू करण्याची मागणी केली. स्थानिकांना डावलून महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना, विशेषतः पत्नींना, कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्यामागील कारण काय ? असा थेट सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. संजय कदम यांनी यावेळी साई केदार सर्विस या कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या कंपनीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक बेरोजगारांना संधी नाकारून बाहेरील किंवा संबंधितांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.