लांजा (गोविंद चव्हाण) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तसेच हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, पॅकेज-७ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लांजा येथे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून राष्ट्रीय महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा कोकणाच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा असून या महामार्गामुळे वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामुळे प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळणार असून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.