मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली. सुरुवातीला योजनेतील काही अटींमुळे अनेक शेतकरी वंचित राहणार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २६-२७ वर्षांची अट मागे घेण्यात आली असून, त्यामुळे सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
रोहित पवार म्हणाले, “काल अधिवेशन संपत असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. सरसकट दोन लाख रुपयांची मदत मिळावी, अशी आमची मागणी होती. पंढरपूरमधील अन्नत्याग आंदोलनातही आम्ही ही मागणी केली होती. सरकारने २६-२७ वर्षांची अट काढून टाकली. शेतकरी आक्रमक होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यानंतर सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो.”
रोहित पवार पुढे म्हणाले, “अनेक आमदार आणि खासदार सत्तेत गेले. अनेकांनी माझ्या उपोषणावर टीका करत ‘हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे,’ असे म्हटले. मात्र, आम्ही यासाठी सातत्याने संघर्ष केला. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळते. काही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. बीडमधील शेतकऱ्यांना ८०० कोटी रुपये मिळालेले नाहीत. मनरेगाची देयके थकीत आहेत. पुरेशी वीज मिळत नाही. या सर्व प्रश्नांसाठी आम्हाला पुढेही संघर्ष करावा लागेल. सरकारने आयकर विभागाकडे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. लाडकी बहीण योजनेसाठीही अशीच माहिती मागवण्यात आली होती. त्यासाठी चार महिने लागले होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.