लांजा (गोविंद चव्हाण) : भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने मुंबई-गोवा महामार्गावरील उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथील शांतीनगर परिसरात घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपाडा जंक्शन (मुंबई) येथील रहिवासी असलेले कुरेशी कुटुंबीय मुंबईहून गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. यामधील अनस इरफान कुरेशी (वय ३१, रा. पटेल अपार्टमेंट, एम. ए. रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई) यांचा महिनाभरापूर्वी विवाह झाला होता. हे कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी गोव्याला गेले होते. गोव्यातील सहल आटोपून ते आज, बुधवारी पहाटे मुंबईकडे परतत होते. त्यांच्यासोबत आई यास्मिन इरफान कुरेशी (वय ५४), पत्नी फिजा अनस कुरेशी (वय २७) तसेच महम्मद इरफान कुरेशी (वय १५, सर्व रा. एम. ए. रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई) हे होते. कुरेशी यांच्या मालकीची क्रेटा कार (क्र. एमएच ०१ सीपी ८०२१) चालक मुस्तफा अल्फाज काझी (वय २४) चालवत होता.

बुधवारी पहाटे गोव्याहून मुंबईकडे येत असताना ही क्रेटा कार लांजा येथील रेस्ट हाऊस, शांतीनगर परिसरात आली. त्यावेळी भरधाव वेगामुळे चालक मुस्तफा काझी याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोर उभ्या असलेल्या डंपरवर (क्र. एमएच ०५ ईएल ३८७७) पाठीमागील बाजूस जाऊन आदळली. त्यानंतर कार डंपरला घासत पुढे जाऊन महामार्गावरील दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघात इतका भीषण होता की, क्रेटा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात अनस कुरेशी गंभीर जखमी झाले. तर त्यांची आई यास्मिन इरफान कुरेशी, पत्नी फिजा अनस कुरेशी, महम्मद इरफान कुरेशी आणि कारचालक मुस्तफा अल्फाज काझी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी लांजा पोलिसांना नगरसेवक वैभव जोईल तसेच युगंधर जोईल, वैभव गांधी, भास्कर तिखे, प्रताप जेधे आणि स्वरूप एकलुरे यांनी सहकार्य केले.

हा अपघात इतका भीषण होता की, क्रेटा कारमधील प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुरेशी कुटुंबीय दुपारी एकच्या सुमारास लांजा येथे दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर या अपघातात जखमी झालेल्या अनस कुरेशी यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.