रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अकले गावाजवळील काळ नदीला आलेल्या अचानक पुरामुळे दोन युवक बेटावर अडकल्याची घटना घडली. आदिल शकील खान आणि शंभू हे दोघे सायंकाळी फिरण्यासाठी नदीपात्रातील बेटावर गेले असताना, वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली आणि ते चहुबाजूंनी पाण्याने वेढले गेले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही युवकांची सुखरूप सुटका केली.