लांजा:(गोविंद चव्हाण) : यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना, आता शेजारील गावातील मोकाट गुरांच्या त्रासाने सडवलीतील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाऊस नसल्याने विहिरीवरून मोटार लावून, पाणी उपसून शेतकऱ्यांनी कष्टाने भातशेती जगवली आहे. मात्र, सकाळी ८ च्या सुमारास साटवली गावातील तालयवाडी येथील मोकाट जनावरांनी सडवलीच्या ‘शेंब्याची तळी वडाजवळ’ असलेल्या भातशेतीत शिरून उभ्या पिकाची पूर्ण विल्हेवाट लावत संपूर्ण शेती नागवून टाकली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, यंदा पाऊस अतिशय कमी पडल्यामुळे सडवली परिसरातील शेती सुकू लागली आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही पदरचे पैसे खर्च करून, मोटार व पाईपलाईनची व्यवस्था करून शेतकऱ्यांनी पाणी उपसून आपली भात पिके कशीबशी जगवली आहेत.
अशातच, एका दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास साटवली गावातील तालयवाडी येथील काही पशुपालकांनी सोडून दिलेली ७ ते ८ मोकाट जनावरे सडवली येथील शेंब्याची तळी वडाजवळील शेतात अचानक घुसली. या गुरांनी उभ्या भातशेतीची अक्षरशः तुडवणूक केली आणि तोंडात आलेला घास हिरावून घेतला. यामध्ये स्थानिक शेतकरी वासुदेव डांगे, शांताराम जुवळे आणि सुवास रांबाडे यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण पिकाची नागदूस झाली आहे.
कष्टाचे पाणी घालून आणि अहोरात्र मेहनत करून वाढवलेले पीक शेजारील गावातील मोकाट गुरांमुळे डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने डांगे, जुवळे आणि रांबाडे यांच्यासह संपूर्ण सडवली गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. साटवलीतील संबंधित पशुपालकांच्या बेजबाबदारपणामुळे सडवलीतील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
“यंदा पाऊस नसल्याने आम्ही डिझेल आणि लाईटचा खर्च करून, मोटार लावून पाणी उपसून पिके जगवली होती. सकाळी ८ च्या सुमारास साटवली तालयवाडी येथील ही गुरे शेतात घुसली आणि त्यांनी संपूर्ण पिकाची नागदूस केली. आमच्या कष्टावर पाणी फिरले असून प्रशासनाने या गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करावी,” अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, मोकाट गुरांच्या मालकांना समज देऊन त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
