मुंबई-पनवेल : स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजाडे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून विजय बाबू भंडारी (३६), तुषार अरुण पिंगळे (३४), रोहित रंगाप्पा गौडा (२१) आणि दर्शन उमाशंकर (२१) या चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाइल, डेबिट कार्ड, सिमकार्ड, रोख रक्कम व अन्य साहित्य असा सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे आरोपी विविध फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांशी संपर्क साधत होते. मोठ्या रकमेचे कर्ज सहज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून त्यानंतर प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, जीएसटी आणि होल्डिंग चार्जच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळले जात होते. गुप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस, सायबर पोलीस आणि कळंबोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने करंजाडे येथील नीलगिरी अपार्टमेंटमधील रूम क्रमांक ४०१वर छापा टाकला. कारवाईत तीन लॅपटॉप, १५ मोबाइल, सात डेबिट कार्ड, ३१ सिमकार्ड, दोन हिशोबाच्या वह्या, एक डायरी, वाय-फाय राऊटर, नेटवर्क टर्मिनल आणि ७४ हजार ४०० रुपये रोख जप्त करण्यात आले.

या टोळीने आतापर्यंत किती नागरिकांची फसवणूक केली आहे तसेच या रॅकेटचे जाळे अन्य कोणत्या राज्यांपर्यंत पसरले आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून कर्जाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.