मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. देशातील विद्यार्थी संतप्त झाल्यानेच ते रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावर मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व काँग्रेस खासदार यांना दिलेली वागणूक या विरोधात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत भाजपा विरोधात एल्गार पुकारला.
काँग्रेसने गांधी भवन पासून भाजपा कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. भाजपाच्या कार्यालयात जाऊन त्यांना संविधान भेट देण्याची काँग्रेसची भूमिका होती पण पोलिसांनी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना रिगल सिनेमाजवळ ताब्यात घेतले. ‘मोदी हटाव, देश बचाव’, ‘जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है’, या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, अमित कारंडे, राणी अग्रवाल, झिशान अहमद, ब्रिज दत्त, आनंद सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनापूर्वी गांधी भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मागील १२ वर्षापासून देशात लोकशाही व संवैधानिक मुल्ये बासनात गुंडाळून ठेवली आहेत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी तरुणांची घोर फसवणूक केली आहे. रोजगार तर दूर राहिले आज परिक्षाही व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. परीक्षा पद्धतीत सुधारणा करावी व पेपरफुटीवर संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केली होती पण मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. नीटचा पेपर हा काही यावर्षीच फुटला असे नाही तर तब्बल ७१ वेळा पेपर फुटला आहे. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज हे अभियान हाती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढा पुकारला आहे. पक्षातील नेतेच भाष्य करू शकतील, असेही सपकाळ यांनी सांगितले.
