चिपळूण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खेर्डी येथील रेल्वे पुलाजवळ लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार प्रमोद जठार आणि भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनरची अशी तोडफोड होणे ही दुर्दैवी बाब असून, अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
चिपळूण तालुक्याची सुसंस्कृत परंपरा कायम राखण्यासाठी अशा घटना पुन्हा घडू नयेत, तसेच संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, भाजप बँकिंग सेलच्या जिल्हा संयोजक दीपा देवळेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस सुहास साळुंखे, भाजपच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अनिल लांजेकर, भाजपच्या औद्योगिक सेलचे जिल्हा संयोजक गजानन जाधव, भाजपचे कार्यकर्ते अमोल महाडिक यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदन सादर केले. श्री. मेंगडे यांच्या अनुपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक राजेश जाधव यांनी हे निवेदन स्विकारले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आले.
