पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावात बकऱ्यांना चक्क झुल पांघरल्याचे अनोखे दृश्य गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या कशेडी घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या पळचिल गावातील माजी सरपंच वैशाली जाधव यांच्या बकऱ्यांचा कळप नेहमीप्रमाणे पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील हिरव्यागार गवतावर चरण्यासाठी आला होता. मात्र, या सर्व बकऱ्यांना रंगीबेरंगी आणि आकर्षक झुल पांघरल्याचे पाहून अनेकांचे लक्ष वेधले.
याबाबत माजी सरपंच वैशाली जाधव म्हणाल्या, “पावसाळ्यात हवेत गारवा वाढतो. त्यामुळे बकऱ्यांच्या दाट लोकरीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्या अधिक गारठतात. अशा वेळी बकऱ्यांना स्वच्छ व कोरडे पुसून जुन्या कापडांपासून गोधडीप्रमाणे झुलीसारखे वस्त्र शिवून त्यांच्या पाठीवर टाकल्यास त्यांना उब मिळते आणि शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.”
नवीन कपडे परिधान केलेल्या अवखळ आणि आनंदी बालकांप्रमाणे सजलेल्या या बकऱ्या सध्या पळचिल गावातील शेतांमधून फिरताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
