मुंबई : प्रखर विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार आणि ‘दैनिक तरुण भारत’चे माजी संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. अभ्यासू वृत्ती, संतुलित विचार आणि विलक्षण कुतूहल ही लक्ष्मणरावांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये होती. आपल्या प्रगाढ व्यासंग आणि प्रतिभासंपन्न लेखणीद्वारे त्यांनी समाजात परिवर्तन घडवले. तसेच मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि माध्यम अनुशासनाद्वारे त्यांनी मराठी पत्रकारितेला वैचारिक अधिष्ठान दिले, अशा शब्दात भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.
असंख्य तरुण पत्रकारांना मार्गदर्शन करून लक्ष्मणराव जोशी यांनी पत्रकारितेची सशक्त पिढी घडवली. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता विश्वासोबतच राष्ट्रीय विचार परिवारामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, सहकारी आणि चाहत्यांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.