लांजा : भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजनांप्रती कृतज्ञता, आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंचे ऋण मान्य करून त्यांना वंदन करण्याची परंपरा या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. याच भावनेतून न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गुरुवंदनेचा विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित केला.
या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक वसंत आजगावकर , उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे , पर्यवेक्षक रविंद्र वासुरकर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे स्वागत करून त्यांच्याप्रती असलेला आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थी कु. वेदश्री भागवत व कु. संजना जाधव यांनी केले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवंदनेवरील भावपूर्ण गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्कार आणि जीवन घडविण्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षक कुंडलिक जांभळे यांनी विद्यार्थी आणि गुरू यांच्या नात्याचा गोडवा विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी स्वतः आयोजित केलेल्या या उपक्रमाचे शिक्षकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. मेघशाम मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
