मुंबई : ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगाद्वारे काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारत आहे का? काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावरील त्याकाळातील टीका योग्य होती असं मानत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर कॉंग्रेसने अशोभनीय ट्वीट केले आहे. त्याला उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात त्यांच्या विरोधकांकडून अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. मात्र इंदिरा गांधी यांनी कोणालाही शब्दांनी नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले होते. बांग्लादेश मुक्तिसंग्रामातील नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेमुळे त्या जागतिक स्तरावर प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळानंतर त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक विविध राजकीय नेत्यांनीही केले होते याची आठवण उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला करून दिली आहे.

ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात अन्यायकारक व महिलेचा अवमान करणारी टीका मानले होते, त्याच शब्दप्रयोगाचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? याचा अर्थ काँग्रेस आज अप्रत्यक्षपणे हे मान्य करत आहे का? असाही सवाल उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला केला आहे.

हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही; तर सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संस्कृतीचा आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते; परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही अशा शब्दात उमेश पाटील यांनी कॉंग्रेसला खडसावले आहे.

काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी अपेक्षा उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.