लांजा : बेनी खुर्द-खेरसवे ग्रामपंचायत आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, पुणे (मासूम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेला बाळ मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून झाली. महामानवांच्या प्रतिमांना मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
मासूम संस्थेचे फेलो अमर पवार, चंद्रमणी सावंत तसेच प्रा. विशाखा पावसकर यांनी गाणी, खेळ, गप्पा आणि गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध उपक्रमांतून संविधानातील मूल्यांची ओळख करून देत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला. प्रा. विशाखा पावसकर यांनी संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात सरपंच रुपाली लोटणकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संविधानिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला सरपंच रुपाली लोटणकर, उपसरपंच मोहन धनावडे, ग्रामपंचायत सदस्य मोनिका चव्हाण व रोहिणी धनावडे, पोलीस पाटील रुपाली कांबळे, आशा सेविका नम्रता साळुंखे व प्राची सुर्वे, बचत गट सीआरपी धनश्री जाधव व रेश्मा जाधव आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन श्रावणी पांचाळ यांनी तर प्रस्तावना अमर पवार यांनी मांडली. चंद्रमणी सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.