पुणे : साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे होणार आहे.
कार्यक्रमाला डॉ. सागर देशपांडे हे विशेष अतिथी व वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. देशपांडे हे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष तसेच मासिक ‘जडण-घडण’चे मुख्य संपादक आहेत.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार श्री. सम्राट फडणीस, उत्कृष्ट नाटककार पुरस्कार श्री. प्राजक्त देशमुख, तर उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार श्री. प्रवीण तरडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आचार्य अत्रे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमांना यापूर्वीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रमास साहित्यप्रेमी, वाचक, पत्रकार, कलाकार आणि नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
