दापोली(सागर गोवळे) : ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, दापोली, यांच्या कृषी अभियांत्रिकी व वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली वानौशी येथील कृषिस्नेही व कृषिसखी गटांच्या सहकार्याने ‘भात शेती व शेतीतील विविध अभियांत्रिकी तंत्रज्ञान व अळंबी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे ३५ शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. सचिन पाठक व डॉ. श्रीकांत रिटे यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सचिन पाठक यांनी आधुनिक कृषी अभियांत्रिकी व भात शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषी अवजारांची माहिती देऊन त्यांच्या उपयोगाविषयी मार्गदर्शन केले.या ठिकाणी श्री दीपक रेवाळे यांनी अवजारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.यामध्ये वैभव विळा, अतुल चिकू झेला, नूतन आंबा झेला, अमर बांडगुळ छाटणी यंत्र, अंकुर दातेरी फावडा, पंकज पडलर, कोनो वीडर, सुपारी सोलणी यंत्र व सी ए इ टी ओले काजू बी गर काढणी अवजार आदी अवजारे यंत्र व मशीन यांचा समावेश होता. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीची कार्यक्षमता वाढविता येते.लागणारे श्रम कमी करता येते व तसेच शेती करता लागणारा पैसा व मनुष्यबळ यांचा देखील योग्य वापर करून शेती किफायतशीर करता येते. असे त्यांनी सांगितले.
यानंतर डॉ. श्रीकांत रिटे यांनी अळंबी उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी खाद्य, औषधी व विषारी अळंबीचे प्रमुख प्रकार समजावून सांगितले. तसेच उत्पादनासाठी आवश्यक साहित्याची निवड, माध्यमाची तयारी व निर्जंतुकीकरण, स्पॉन व स्पॉनिंग प्रक्रिया, योग्य तापमान व आर्द्रता राखणे, पीक व्यवस्थापन आणि योग्य अवस्थेत अळंबीची काढणी याबाबत सविस्तर माहिती दिली. कमी जागेत व स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून अळंबी उत्पादन करता येते तसेच त्यातून शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमातून उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि अळंबी उत्पादनाबाबत उपयुक्त माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शक, आयोजक, शेतकरी व उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
सदर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषतज्ञ डॉ.सचिन पाठक व डॉ.श्रीकांत रिटे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाले.
