लांजा : बकरी ईद निमित्त लांजा तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार मुस्लिम बांवांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा पोलीस ठाण्यात संवाद साधला.

मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्त्व असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लांजा तालुक्यातील मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी गुरुवार, २१ मे रोजी सकाळी ११ वाजता लांजा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली.

यावेळी आगामी काळात बकरी ईद असल्याने सदर उत्सवकाळात लांजा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये शांतता राहावी, याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गोवंश कायद्याचे तंतोतंत पालन करावे, जनावरांची अवैधरित्या वाहतूक करू नये, असे सांगण्यात आले. सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्ट अथवा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

दरम्यान, उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच लांजा शहरासह तालुक्यात सलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला. याप्रसंगी बैठकीला लांजा शहरासह तालुक्यातील विविध गावांतील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.