सांगली : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जरांगे पाटील त्यांच्याशी संवाद साधत आहेत.
त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली.
या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता
दरम्यान, आज कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅंनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ- पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्तारोको केला आहे.